सोलापूर : शहरात गेल्या १० दिवसांपासून मोठ्या उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त होणार आहे. गणेश मूर्तींचे सार्वजनिक मिरवणुकीद्वारे आणि वैयक्तिकरीत्या भक्तिमय वातावरणात विसर्जन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी सोलापूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत नियोजनबद्ध आणि कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणेशोत्सव कालावधीत आणि विशेषतः विसर्जन दिवशी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच बाहेरील जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात ३ पोलीस उप आयुक्त, ८ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि २४ पोलीस निरीक्षक यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली बंदोबस्त सांभाळला जाणार आहे. याशिवाय ७९ स्थानिक आणि ११ बाहेरील असे एकूण ९० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक (सपोनि/पोसाई) आणि १२२७ स्थानिक व ७५ बाहेरील असे एकूण १३०२ पोलीस अंमलदार या विसर्जन सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवून असणार आहेत.
मिरवणूक मार्गावर आणि गर्दीच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी ४३६ होमगार्ड आणि एसआरपीएफची (SRPF) १ तुकडी देखील सोलापुरात दाखल झाली आहे. शहरातील प्रमुख विसर्जन मार्ग, गर्दीचे चौक आणि संवेदनशील ठिकाणांवर चोख पहारा ठेवण्यात आला आहे.
सर्व नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून विसर्जन मिरवणुका शांततेत व उत्साहात पार पाडाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





















