सोलापूर – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या आयुष्मान कार्ड निर्मिती मोहिमेत सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ याकालावधीत राज्यात १२ व्या क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा आता थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
१ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ४५ आयुष्मान कार्डांची निर्मिती करण्यात आली होती. या कामगिरीमुळे जिल्ह्याचा राज्यातील क्रमांक १२ वा होता. त्यानंतर १ एप्रिल २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल २ लाख ५० हजार ७६२ कार्डांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या कामगिरीत ७४ टक्क्यांची वाढ झाली असून राज्यातील क्रमवारीतही मोठी सुधारणा झाली आहे.
चौकट
साडेनऊ लाखांहून अधिक कार्डांचे वितरण
आयुष्मान कार्ड वितरणाच्या बाबतीतही जिल्ह्याने मोठी मजल मारली आहे. एप्रिल २०२६ पूर्वी जिल्ह्यात ७ लाख ११ हजार ८१ कार्डे प्राप्त झाली होती. या सर्व कार्डांचे वितरण पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर १ एप्रिल ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आणखी २ लाख ४१ हजार १५६ कार्डे प्राप्त झाली असून त्यांचेही वितरण पूर्ण करण्यात आले आहे.त्यामुळे आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात एकूण ९ लाख ५२ हजार २३७ आयुष्मान कार्डांचे वितरण पूर्ण झाले आहे.
चौकट
सेवा संकल्प अभियानाला मिळाले बळ
ग्रामीण व शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आयुष्मान कार्ड निर्मिती व वितरणाला गती देण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांसह सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून कार्ड निर्मितीच्या कामाला वेग मिळाला आहे. राज्यातील क्रमवारीत झालेली ही झेप जिल्ह्यातील आरोग्य योजना प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
Post Views: 12