सोलापूर : गणेशोत्सवातील महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदानासाठी रस्त्यावर भट्टी अथवा चुली पेटविणे गणेश मंडळांनी टाळावे. भट्टीच्या तीव्र उष्णतेमुळे डांबरी रस्ते खराब होऊन डांबर वितळण्यासह खड्डे पडण्याची शक्यता असल्याने महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मंडळांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवात शहरातील विविध मंडळांकडून महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांवरच भट्टी उभारली जाते. मात्र, थेट रस्त्यावर पेटवलेल्या भट्टीमुळे डांबरी पृष्ठभागाचे नुकसान होते. परिणामी रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढू शकतो.
महापालिकेने भट्टी शक्यतो मोकळ्या जागेत किंवा मैदानात उभारण्याची सूचना केली आहे. अपरिहार्य परिस्थितीत रस्त्यावर भट्टी ठेवावी लागल्यास तिच्याखाली किमान सहा इंच वाळू, माती किंवा मुरूमाचा थर टाकावा. तसेच भट्टीचा रस्त्याशी थेट संपर्क होऊ नये यासाठी लोखंडी स्टँड किंवा पत्र्याचा वापर करावा.
कार्यक्रमानंतर परिसर स्वच्छ करून सार्वजनिक रस्ते पूर्ववत ठेवावेत. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांचे संरक्षण लक्षात घेऊन मंडळांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन
अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी केले आहे.
———
Post Views: 6