सोलापूर – अज्ञात कारणावरून एका २३ वर्षीय अविवाहित तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना कुंभारी शिवारात रे नगर -मुळेगाव रोड येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. शिवकुमार सोमय्या स्वामी (वय २३ वर्ष, रा. किसान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
शिवकुमार हा मोटार चालक होता. तो कुटुंबीयासोबत वरील ठिकाणी राहण्यास होता. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तो कुंभारी शिवारातील विहिरीवर आला आणि दारू प्राशन करून भावाला फोन केला व मी विहिरीत उडी मारून आत्महत्या करीत आहे, तरी तू या ठिकाणी येऊन माझी दुचाकी व मोबाईल घेऊन जा असे म्हटले. त्यानंतर त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. भावाने त्वरित त्या विहिरीकडे धाव घेतली व वळसंग पोलिसांना ही खबर दिली. विहिरी जवळ आल्यावर भावाला शिवकुमारचा मोबाईल व दुचाकी आढळून आली. घटनास्थळी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस व्ही कुंवर यांनी पोहोचून फायर ब्रिगेडला पाचारण केले. फायर ब्रिगेड पथकाने सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्रयत्न केला मात्र विहीर मोठी व खोलवर असल्याने शिवकुमार चा मृतदेह आढळून आला नाही. त्यानंतर फायर ब्रिगेड वाले निघून गेले.दुसऱ्या दिवशी आज बुधवारी फायर ब्रिगेड पथक सकाळी पोहोचून शिवकुमारचा मृतदेह पाण्यातून शोधून काढला. पंचनामा करून पोलीस हवालदार कुंवर यांनी सदरचा मृतदेह शव विच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात सकाळी साडेअकरा वाजता दाखल केला. मयत शिवकुमारच्या पश्चात आई, भाऊ ,वहिनी असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.