सोलापूर : भारतीय सरित-सराक महासंघाच्या मान्यतेने आणि सरित-सराक असोसिएशन ऑफ जम्मू-काश्मीर यांच्या आयोजनाखाली ७ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान हॉटेल पार्क पॅलेस, पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे ४ थी राष्ट्रीय सरित-सराक अजिंक्यपद स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. या राष्ट्रीय स्पर्धेत मणिपूर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर यांसह विविध राज्यांतील २५० हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेच्या अधिकृत निकालानुसार मणिपूर संघाने प्रथम, यजमान जम्मू-काश्मीर संघाने द्वितीय, तर महाराष्ट्र संघाने तृतीय क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर राज्याचा दबदबा निर्माण केला. महाराष्ट्र संघाने एकूण ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह तब्बल १९ पदकांची उल्लेखनीय कामगिरी केली असून, महाराष्ट्राच्या या दैदिप्यमान यशात सोलापूर जिल्ह्यातील कंदलगाव येथील इंडियन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींचा सिंहाचा वाटा राहिला आहे. इंडियन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी उपकनिष्ठ मुली (अहनबा चेनाबा) गटात घवघवीत यश मिळवत राज्याचा तिरंगा राष्ट्रीय स्तरावर फडकवला. यामध्ये ३५ किलोखालील वजनी गटात प्रतीक्षा परशुराम पुल्लुर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले. याच वजनी गटात आकांक्षा सुरेश चव्हाण हिने रौप्य पदक मिळवले. तसेच ४० किलोखालील वजनी गटात श्रेया गोविंद राठोड हिने रौप्य, तर ४० किलो वजनी गटात श्रावणी तुकाराम जाधव हिने रौप्य पदकावर आपली मोहर उमटवली. या राष्ट्रीय स्पर्धेत संघ व्यवस्थापक म्हणून विलास राठोड व अधिकृत प्रतिनिधी म्हणून सुरेश चव्हाण यांनी काम पाहिले. इंडियन पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे, सातत्यपूर्ण सरावाचे आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे, असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष बिरप्पा शेजाळ यांनी काढले.
या यशाबद्दल शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कौतुक सोहळ्यास संस्थेच्या उपाध्यक्षा आकांक्षा शेजाळ-वाघ, सचिव अपर्णा शेजाळ, मुख्याध्यापिका मोनिका सुरवसे, अनुराधा पिसे, क्रीडा शिक्षक महासिद्ध वाले, रत्नदीप भोपळे, निखिल घोडके उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अप्पासाहेब चिंचकर व मनीष लिंबोळे यांचे मोलाचे क्रीडा मार्गदर्शन तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कंदलगावच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी थेट जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन राष्ट्रीय स्तरावर पदकांची लुट केल्यामुळे संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यातून या सुवर्णकन्यांवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.