सोलापूर : आजच्या एआयच्या युगात विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत असून विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या कौशल्यांचा सातत्याने विकास करणे गरजेचे आहे. भविष्यात वैद्यकीय, वकिली, न्यायनिवाडा, अकाउंटिंग, डीटीपी डिझायनिंग, संगणक टायपिंग, पेंटिंग आदी क्षेत्रांमध्येही तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डेटा ॲनालिसिस, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, क्लाऊड टेक्नॉलॉजी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. राकेश सुरम (पुणे) यांनी केले.
उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेतील दहावे व समारोपाचे व्याख्यान भू. म. पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुरम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिंडी, उपाध्यक्ष देविदास गोटीपामुल, व्याख्यानमालेचे प्रेसिडेंट यल्लादास लछमापुरे, अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, रोटरी एमआयडीसीचे प्रभारी अध्यक्ष काशिनाथ कुंटला, प्रभारी सचिव व्यंकटेश मेरगु, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक पगडीमल, श्रीनिवास सामलेटी, परशुराम रापेल्ली, गणेश इराबत्ती, सिद्धेश्वर गड्डम, अंबादास गड्डम आणि प्रेम चव्हाण यांनी परिश्रम घेतले. यावेळी स्पृहा इराबत्ती यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा. विठ्ठल वंगा यांनी सूत्रसंचालन केले, तर गोवर्धन चव्हाण यांनी आभार मानले.
‘आय कॅन विन’ हा दृष्टिकोन
अंगीकारण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
डॉ. सुरम यांनी विद्यार्थ्यांना ‘आय कॅन विन’ हा दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच स्वतःवरील विश्वास (सेल्फ बिलीफ) आणि आत्मविश्वास (सेल्फ कॉन्फिडन्स) वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जीवनात ‘तीन एच’ म्हणजे, हेड (बुद्धी), हार्ट (दया) आणि हँड (सेवा) यावर लक्ष केंद्रित केल्यास आदर्श व्यक्तिमत्त्व घडवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
…………………
Post Views: 16