टेंभुर्णी – चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने कन्हेरगाव परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, गावातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे हातपंप व कूपनलिका आटू लागल्याने ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात कन्हेरगाव (ता. माढा) येथील केदार कुटुंबीयांनी माणुसकीचे दर्शन घडवत स्वतःच्या शेतातील बोअरमधून ग्रामस्थांना गेल्या १४ वर्षांपासून मोफत पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.
कांतीलाल सौदागर केदार यांचे सुपुत्र राजेंद्र, कृष्णदेव व सुशांत केदार हे बंधू हा उपक्रम अविरतपणे राबवत आहेत. विशेष म्हणजे सन २०१२ पासून त्यांच्या शेतातील बोअर ग्रामस्थांसाठी खुला करण्यात आला असून, आजही या माध्यमातून दररोज सुमारे १० हजार लिटर पाणी मोफत उपलब्ध करून दिले जाते.
कन्हेरगावातील लोहार-केदार गल्ली येथे सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एक हजार लिटर क्षमतेच्या टाकीतून पाणी उपलब्ध करून दिले जाते. सकाळ, दुपार आणि सायंकाळी पाणी भरण्यासाठी महिला, लहान मुले-मुली तसेच गोरगरीब ग्रामस्थांची केदार यांच्या घराजवळ मोठी वर्दळ पाहायला मिळते.
शेत गावापासून लांब; तरीही घरापर्यंत पाणी ,केदार कुटुंबीयांची शेती गावापासून काही अंतरावर आहे. मात्र, ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या खर्चाने शेतातील बोअरपासून घरापर्यंत पाइपलाइन टाकून पाणी आणले आहे. घराजवळ एक हजार लिटरची पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली आहे .त्यानंतर हे पाणी गावकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले जाते.
कांतीलाल सौदागर केदार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून, त्यांच्या वाट्याला केवळ दीड एकर शेती आहे. त्यांना राजेंद्र, कृष्णदेव आणि सुशांत अशी तीन मुले आहेत. तिन्ही भावांच्या वाट्याला प्रत्येकी सुमारे अर्धा एकर जमीन येत असतानाही त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल माजी आमदार संजयमामा शिंदे , कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी केदार कुटुंबियाचे कौतुक केले आहे .
सध्या गावात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना केदार कुटुंबीयांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही गेल्या १४ वर्षांपासून स्वतःच्या शेतातील बोअरचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले करून देणाऱ्या राजेंद्र केदार व त्यांच्या कुटुंबीयांचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. ‘स्वतःसाठी जगताना समाजासाठीही काहीतरी देणे’ या भावनेतून सुरू असलेला हा उपक्रम कन्हेरगावात माणुसकीचा आदर्श ठरत आहे. मात्र उजनी धरणापासून कनेरगाव थोड्याच अंतरावर असताना गावात अशी परिस्थिती येत असेल तर किती वाईट अवस्था म्हणावे लागेल की ग्रामपंचायत पाणीपुरवठा करू शकत नाही ती एक कुटुंब करू शकते या केदार कुटुंबाकडून पाणीपुरवठा गोरगरीब कुटुंबांना करीत असल्यामुळे एवढेच मनावे लागेल की उजनी धरण उशाला कोरड घशाला कारण याचा अर्थ असा की 14 वर्षापासून कनेरगाव मध्ये पाणीपुरवठा अजूनही विस्कळीत दिसत आहे
चौकट.
——-
चौदा वर्षांपासून मोफत पाणीसेवा
सन २०१२ पासून सलग चौदा वर्षे कन्हेरगावातील गोरगरीब नागरिकांसाठी आमच्या कुटुंबीयांच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू केलेली ही सेवा यापुढेही अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचे राजेंद्र केदार यांनी सांगितले.
Post Views: 11