सोलापूर : पदवीधरांच्या रोजगाराचा प्रश्न, आर्थिक स्थैर्य आणि परीक्षांमधील गैरप्रकार या प्रमुख मुद्द्यांवर विधान परिषदेत आवाज उठविणार आहे, अशी भूमिका पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार प्रा. एन. डी. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी केवळ कागदावर पाठपुरावा न करता ते विधान परिषदेच्या पटलावर मांडून त्यावर उत्तर मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांसमोरील रोजगाराचा प्रश्न, आर्थिक स्थैर्य तसेच परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पदवीधर आमदार म्हणून विधान परिषदेत गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत पदवीधरांसाठी कोणते प्रश्न उपस्थित केले आणि त्यावर कोणती उत्तरे मिळवली, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यास मी तयार आहे.
पदवीधरांचे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता त्यासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मी तुमच्यातीलच एक सहकारी असून, पदवीधरांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेस शशिकांत थोरात, शारदा लवटे, राजेश लवटे, नितीन देशमुख, तात्या आर्किले, संतोष वारगड, सायबान्ना तेगेल्ली, सुयश कर्चे आदी उपस्थित होत्या.
Post Views: 9