बार्शी – कर्मवीरांच्या नगरीत नवविचारांना साद देणारा २२ वा युवा महोत्सव श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे उत्साहात पार पडला. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. राहुल पालके यांनी लिहिलेल्या ‘युवा महोत्सव कर्मवीरांच्या नगरी’ या कवितेतून बार्शीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वेध घेतला आहे.
तुकोबांच्या अभंगवाणीला कर्मवीरांच्या विचारांची जोड देत नव्या पिढीला प्रेरणा देणारी विचारधारा या कवितेत व्यक्त झाली आहे. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीची ठिणगी, शाहीरांची लढाऊ परंपरा आणि नवयुवकांच्या मनात चेतना निर्माण करणाऱ्या लोककलांचा संदर्भ कवितेतून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
कर्मवीर मामांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची ध्येयगाथा घडवली. त्यांच्या विचारांमुळे बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि बार्शीला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख मिळाली, हा ऐतिहासिक संदर्भही कवितेत अधोरेखित केला आहे.
अमर शेखांच्या पोवाड्याचा संदर्भ घेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शाहिरी परंपरेचे योगदान आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात लोकसंस्कृतीने रुजवलेली मुळे यांचे चित्रण करण्यात आले आहे. संगीत, जलसा आणि पोवाड्याच्या माध्यमातून तरुणाईच्या मनात नवक्रांतीचा सूर आणि परिवर्तनाची ऊर्जा निर्माण होत असल्याचे कवीने नमूद केले आहे.
‘इंद्रधनुष्याच्या दारी सप्तरंगांची उधळण’ या प्रतिमेतून युवा महोत्सवातील विविध कलागुण, विचार आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे रंग उलगडतात. तरुणाईच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या या महोत्सवामुळे श्री शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात ज्ञान, कला, संस्कृती आणि नवविचारांची अनोखी पर्वणी अनुभवायला मिळत आहे.
तुकोबांच्या अभंगवाणीपासून नवयुवकांच्या नवविचारांपर्यंतचा सांस्कृतिक प्रवास कवितेतून उलगडला. युवा महोत्सवातील विविध रंगमंचांना दिलेली नावे यातून तरुणाईला साद घातलेली आहे.
Post Views: 5