सोलापूर – “स्वच्छ परिसर, समृद्ध निसर्ग आणि सुरक्षित वन्यजीव” हा संदेश देत वन्यजीव सप्ताह २०२६ च्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासह स्वच्छता मोहीम व श्रमदान उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमास सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच नगरसेविका सहभाग नोंदवला.
या स्वच्छता मोहिमेत सुमारे २०० जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मृती उद्यान, कंबर तलाव आणि वसंत नगर परिसरात स्वच्छता मोहीम व श्रमदान करून परिसर स्वच्छ करण्यात आला. संगमेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, क्षेत्रीय वनकर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या मोहिमेला पोस्टल सेवा कर्मचारी, इको नेचर क्लब (NGO) आणि सोलापूर महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य लाभले. विविध विभाग, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येत केलेल्या श्रमदानातून लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले. स्वच्छ परिसर, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी विभागीय वनाधिकारी लक्ष्मण आवारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वन्यजीव संरक्षण, जैवविविधतेचे जतन, नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन आणि स्वच्छ पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धनाची चळवळ व्यापक होऊ शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकरयांनी पर्यावरण संवर्धनासाठी युवकांचा सहभाग, स्वच्छतेची सवय आणि निसर्गाप्रती संवेदनशीलता यांचे महत्त्व अधोरेखित केले. वन्यजीव आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.























