सोलापूर : मराठी भाषेला प्राचीन साहित्यिक आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली असून, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीच्या संशोधन, संवर्धन आणि विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले.
शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित वसुंधरा कला महाविद्यालय, जुळे, सोलापूर येथे अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहानिमित्त आयोजित विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेमागील ऐतिहासिक व भाषिक पुरावे विद्यार्थ्यांसमोर मांडले. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचे वाचन व अभ्यास वाढवावा, तसेच दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करून भाषेच्या संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगितले. अभिजात भाषेचा दर्जा ही मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब असून, तिचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. तानाजी देशमुख यांनी केले. डॉ. सुहास उघडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार डॉ. प्रदीप कोल्हे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. रेश्मा सुर्वे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 31