वैराग – प्रस्तावित नागपूर-गोवा ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बार्शी तालुक्यातील मालेगाव (आर) येथे शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. “जमीन बागायती आहे, ती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी मोजणीस स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने अखेर अधिकाऱ्यांना मोजणी न करताच काढता पाय घ्यावा लागला.
नेमके काय घडले?
पवनार ते पत्रादेवी या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगाने मालेगाव (आर) येथील जमिनींच्या मोजणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास गावात दाखल झाले होते. नियमानुसार मोजणीच्या आगाऊ नोटिसा शेतकऱ्यांना बजावण्यात आल्या होत्या.
अधिकारी प्रत्यक्ष शेती गटांमध्ये जाऊन मोजणीची कार्यवाही सुरू करण्याच्या तयारीत असतानाच, परिसरातील शेतकरी एकवटले आणि त्यांनी मोजणीस जोरदार विरोध दर्शवला. महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा स्पष्ट इशारा देत शेतकऱ्यांनी आपले मत लेखी जबाबाद्वारे अधिकाऱ्यांसमोर मांडले.
मोजणी न करताच पंचनामा
शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि लेखी नकार पाहता, प्रत्यक्ष जमिनीची मोजणी करणे अधिकाऱ्यांना शक्य झाले नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने मोजणी रद्द केली आणि या संपूर्ण घटनेचा घटनास्थळीच पंचनामा तयार केला. त्यावर उपस्थित शेतकरी प्रतिनिधींच्या सह्या घेण्यात आल्या.
प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या कार्यवाहीदरम्यान बार्शीचे तहसीलदार एफ.आर.शेख, बार्शी वैराग पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमूल कदब
ने, पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे, मंडळ अधिकारी मनोजकुमार संपकाळ, तलाठी रेश्मा गायकवाड, कृषी अधिकारी कृष्णनाथ शेळके, ग्रामसेवक वाळके, बार्शीचे नगरसेवक कृष्णराज बारबोले आणि जमीन मोजणी अधिकारी व्ही. एस. भुसनीकर हे उपस्थित होते.
तसेच शेतकऱ्यांच्या वतीने संजय नलावडे, पांडुरंग घोडके, नितीन भुसारे, किशोर घोडके, संदेश कुरुंद, नीलेश भुसारे, राहुल नायकवाडी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पुढे काय होणार? मालेगाव परिसराचे लक्ष!
मालेगाव येथील शेतकऱ्यांनी दाखवलेल्या या एकजुटीमुळे शक्तिपीठ महामार्गाच्या भू-संपादनाला मोठा ब्रेक लागला आहे. प्रशासनाच्या या माघारीनंतर आता राज्य शासन आणि संबंधित विभाग कोणती पुढील पावले उचलणार, की शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाची दखल घेऊन मार्गात बदल करणार? याकडे संपूर्ण मालेगाव परिसरासह बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.