जेऊर – महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा नवीन गाळप हंगाम सुरू होत आला असतानाही अनेक कारखान्यांनी अद्याप ऊसाचा पहिला हप्ता किंवा खरेदी दर (FRP) अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून, ऊस दर त्वरित जाहीर करण्याचे कडक निर्देश कारखान्यांना द्यावेत, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात जाऊन यासंबंधीचे अधिकृत निवेदन सादर केले.
साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की, राज्यातील लाखो शेतकरी वर्षभर अपार कष्ट करून साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करतात. अनेक साखर कारखान्यांची गाळप पूर्व तयारी व हालचाली सुरू झाल्या आहेत, मात्र अद्याप कोणत्याही कारखान्याने ऊसाचा पहिला हप्ता किंवा खरेदी दर (FRP) अधिकृतपणे जाहीर केलेला नाही.
ऊस दर वेळेवर जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. दर निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकामांचे आणि पुढील आर्थिक व्यवहारांचे नियोजन करणे अत्यंत कठीण जात आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना ऊसाचा दर त्वरित व वेळेत जाहीर करण्याचे कडक निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील शेतकरी अविनाश मारुती सरडे,इन्नूस दिलावर सय्यद, सचिन अनंतराव गावडे, शंकर रामचंद्र बोद्रे, योगेश दत्तात्रय सरडे आणि अशोक किसन घोगरे यांच्या स्वाक्षरीने साखर आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले असून, यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.