सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव–सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवात विविध कला प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. एकूण १२ पारितोषिके व ४६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर बाजी मारली.
बार्शी श्री शिवाजी महाविद्यालयात हा युवा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवात विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
या युवा महोत्सवात एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इन्स्टॉलेशन, वक्तृत्व स्पर्धा, शास्त्रीय गायन, कथाकथन, वेस्टर्न ग्रुप सिंगिंग, स्किट, भजन, मिमिक्री, पोवाडा, लावणी, रॅली आणि वेस्टर्न सोलो रिदम अशा विविध कला प्रकारांत यश मिळविले. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांसह विविध पारितोषिके पटकावत विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक गुणवत्ता सिद्ध केली.
वक्तृत्व स्पर्धेत किरण सुरवसे, शास्त्रीय गायनात वरद कुलकर्णी, कथाकथनात आदित्य नागणे, वेस्टर्न ग्रुप सिंगिंगमध्ये सानिका भोसले व सहकारी, स्किटमध्ये किरण सुरवसे व सहकारी, भजनात वरद कुलकर्णी व सहकारी, मिमिक्रीमध्ये किरण सुरवसे, पोवाड्यात प्रांजल शिंदे व सहकारी, लावणीत सहाना लोणीकर व सहकारी, तर रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. वेस्टर्न सोलो रिदममध्ये सुधर्म कुलकर्णी यांनी यश मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ यशपाल खेडकर, प्रा. सुशांत नवले, कला शिक्षक सुदर्शन माने, दयानंद बनकर, रोहन पंढरपुरकर, चैतन्य झाडे, विनायक शिंदे, समाधान काटे यांच्यासह संबंधित प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्टतेची परंपरा अधोरेखित झाली आहे.
कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे मत व्यक्त केले. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, संघप्रमुखांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



















