सोलापूर : आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व ट्रस्टींनी पारंपरिक मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिराजवळील पंच कट्टा परिसरातील ब्रिटिशकालीन दीपस्तंभ धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. हा दीपस्तंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करून त्याची दुरुस्ती व पुनर्उभारणी करावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी मध्यवर्ती मंडळाचे उत्सव अध्यक्ष विजय पुकाळे, उपाध्यक्ष मल्लिनाथ सोलापुरे, सहसचिव निलेश शिंदे आणि अतिश देशेट्टी उपस्थित होते. पंच कट्टा हा शहरातील गजबजलेला परिसर असून या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, भाविक, जिल्हा परिषद कर्मचारी आणि शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. नवरात्रोत्सवादरम्यान मध्यवर्ती मंडळाची भव्य मिरवणूकही याच मार्गावरून निघते. अशा वर्दळीच्या ठिकाणी असलेला ब्रिटिशकालीन दीपस्तंभ अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे खिळखिळा झाल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दीपस्तंभ कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. आवश्यक ती सुरक्षिततेची उपाययोजना करून ऐतिहासिक वारसा असलेल्या या दीपस्तंभाची योग्य दुरुस्ती करावी आणि तो पूर्ववत उभा करावा, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली.
Post Views: 12