सोलापूर : सोलापूरची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रुपाभवानी मातेच्या मंदिरात महापूजा व सकाळी 11.30 वाजता घटस्थापना ट्रस्टी वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांचे चिरंजीव मनिष मसरे यांच्या हस्ते करून शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी मेघना मसरे, अर्चना मसरे, स्नेहा मसरे, मनीष मसरे, मिताली मसरे आणि दीपिका चिंचोळी आदी उपस्थित होते. प्रारंभी मंदिरात पहाटे चार वाजता देवीची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता विधिवत महापूजा करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता घटस्थापनेचा मुख्य धार्मिक विधी पार पडला. पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ होती. रुपाभवानी मंदिरात धार्मिक विधींमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हजारो भाविक नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे उत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांनी नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या.
रात्री देवीची नित्योपचार पूजा करून छबिना मिरवणूक काढण्यात आली.
दुष्काळ दूर होण्यासाठी देवीला साकडे
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून, शेतकर्यांसमोर संकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात भरपूर पाऊस पडून जलसाठे भरावेत, विहिरी व तलावांतील पाण्याची पातळी वाढावी आणि नागरिकांसह शेतकर्यांना दिलासा मिळावा, अशी भावना मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी व्यक्त केली.
Post Views: 10