सोलापूर : विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, सहकार्य, जबाबदारी, संवेदनशीलता आणि चांगल्या सवयी रुजवून त्यांना सुसंस्कृत, जबाबदार व मूल्याधिष्ठित नागरिक घडविण्याच्या उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील १३ केंद्रांमध्ये मूल्यवर्धन विषयावरील विशेष केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा उत्साहात पार पडल्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे इब्राहिम नदाफ तसेच दक्षिण सोलापूरच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांच्या सहकार्याने आणि विस्तार अधिकारी मल्लिनाथ स्वामी व गुरुबाळ सणके यांच्या मार्गदर्शनातून या शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात आले.
या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन उपक्रमाबाबत शिक्षकांना विशेष उजळणी प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न घेता त्यांच्यामध्ये नीतिमूल्ये, सामाजिक व भावनिक जाणीव, सहकार्य, संवादकौशल्य, जबाबदारीची भावना आणि सकारात्मक विचारसरणी विकसित व्हावी, यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान जोडी चर्चा, गटचर्चा, कृतीयुक्त उपक्रम, खेळ, गाणी, अनुभव कथन आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग या माध्यमातून मूल्यवर्धनाची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शिकविण्यापेक्षा त्यांना विचार करण्याची, व्यक्त होण्याची, एकमेकांचे ऐकून घेण्याची आणि सहकार्याने शिकण्याची संधी द्यावी, यावर विशेष भर देण्यात आला.


















