अक्कलकोट – नवरात्र महोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी परिवाराच्या वतीने घटस्थापनेच्या दिवशी रविवारी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात सुमारे १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप करण्यात आले.
महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना सणासुदीच्या दिवसांत आर्थिक हातभार लागावा, या उदात्त हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आपुलकी यांचा प्रत्यय या उपक्रमातून आला.
दानशूर चनबसप्पा खेडगी व त्यानंतर शिवशरण खेडगी यांनी जपलेल्या सामाजिक कार्याच्या परंपरेला पुढे नेत खेडगी परिवाराने हा उपक्रम सुरू ठेवला आहे. सुमारे ५१ वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेतून अक्कलकोटच्या सामाजिक जीवनात सेवाभावाचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. बसलिंगप्पा खेडगी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रमांची ही परंपरा पुढे सुरू आहे.
रविवारी दिवसभर अल्पदरात गोडेतेल घेण्यासाठी नागरिक व महिलांनी मोठी गर्दी केली होती. शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून नागरिकांनी तेलवाटपाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना नवरात्रोत्सवाच्या काळात दिलासा मिळाला. महिलांची लक्षणीय उपस्थिती हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
प्रारंभी शहारातील तूप चौकातील मंडपात श्री स्वामी समर्थ महाराज तसेच चनबसप्पा खेडगी, नीलाबाई खेडगी आणि शिवशरण खेडगी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, प्रसिद्ध व्यापारी सुभाष धरणे, अशोक हारकुड, अॅड. अनिल मंगरुळे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, पवित्रा खेडगी, चन्नवीर खेडगी आदी मान्यवर उपस्थित होते.
खेडगी परिवाराबरोबरच सिद्धेश्वर बँकेचे माजी संचालक बसवराज माशाळे, बसवराज गोरे, स्व. चंद्रसेन राठोड यांच्या स्मरणार्थ शैलेश राठोड, मुन्ना राठोड, विकास राठोड, लखन राठोड, मल्लेशप्पा गोरे परिवार आणि करंजा चौक व बसस्थानक परिसरातील नागरिकांनाही अल्पदरात तेलवाटप करण्यात आले.
सण-उत्सवाच्या आनंदात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचाही सहभाग वाढावा आणि त्यांना आवश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्यात, या भावनेतून राबविलेला हा उपक्रम अक्कलकोटमधील सामाजिक एकोपा आणि सेवाभावी परंपरेचे दर्शन घडविणारा ठरला.
खेडगी यांचे सेवाभावी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुनाथ कलशेट्टी, राजु लोकापूरे, मुत्तण्णा वाले, शिवानंद बाळीकाई, दत्तात्रय कलशेट्टी, सिध्दाराम अरबाळे, सीतापती कामाठी, बाबुराव बोदले, हणमंत कोळी, विजयकुमार यारोळे, मल्लिनाथ कलशेट्टी, प्रशांत कडबगांवकर, अंबादास खरटमल आदींनी परिश्रम घेतले.