बार्शी – बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली. प्रभारी अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस
आला आहे.
उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथील नितीन अर्जुन माळी (वय ४०) यांनी त्यांची हिरोहोंडा सीडी डॉन कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एमएच १३ वाय ३६७९) राहत्या घरासमोर उभी केली होती. १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ही मोटारसायकल चोरुन नेली. चोरीस गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे.
याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करुन आरोपींचा माग काढला. पोलिसांच्या पथकाने अवघ्या १२ तासांत दोघांना ताब्यात घेतल्याने मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
या प्रकरणात सर्फराज मुसा शेख (वय ३९) आणि ऐजाज इस्माईल बागवान (वय २८), दोघेही रा. नाळे प्लॉट, बार्शी, यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.