सोलापूर : शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक प्रशांत पल्ली आणि स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जानेवारीपासून शहरात डेंग्यूचे सुमारे ८९० रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच १०० डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण, मलेरियाचे तीन आणि चिकनगुनियाचे २० रुग्ण आढळल्याची आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. ही माहिती विविध रुग्णालयांकडून मिळालेल्या आकडेवारीवर आधारित असल्याने महापालिकेने अधिकृत आकडेवारी संकलित करून पडताळणी करावी. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी तपासणी करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी. रुग्णसंख्या वाढणाऱ्या भागांत विशेष पथके तैनात करून उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा. आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता नियोजनबद्ध कार्यवाही करावी. प्रादुर्भावग्रस्त भागांत तातडीने सर्वेक्षण करून औषध व धूर फवारणी करावी. साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
—-
Post Views: 22