बार्शी – विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात ज्ञानाची गोडी वाढावी आणि शाळेत वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने सुयश विद्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘फिरते बाल वाचनालय’ या अभिनव उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महात्मा गांधी जयंती, २ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट योजनेअंतर्गत अवघ्या दहा दिवसांत जवळपास ६०० पुस्तके भेटस्वरुपात प्राप्त झाली आहेत.
विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त चॉकलेट वाटप करण्याऐवजी पुस्तके भेट देण्याची संकल्पना शाळेने राबविली आहे. या उपक्रमामुळे वाढदिवसाच्या आनंदासोबतच ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. विद्यार्थ्यांनी भेट दिलेली पुस्तके केवळ त्यांच्यापुरती मर्यादित न राहता इतर विद्यार्थ्यांनाही वाचण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्याने दिलेली पुस्तकाची भेट अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालत आहे.
इयत्ता पहिली ते चौथीसाठी प्रत्येक इयत्तेची स्वतंत्र पुस्तक पेटी तयार करण्यात आली आहे. या पेट्यांमधील पुस्तके मराठी व इंग्रजी विषयांच्या तासांना संबंधित वर्गात नेऊन विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिली जातात. एका तुकडीतील वाचन पूर्ण झाल्यानंतर पुस्तके पुन्हा संकलित करुन ती पेटी दुसऱ्या तुकडीमध्ये पाठविली जाते. त्यामुळे प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचण्याची संधी मिळत आहे.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ५० पुस्तके असलेल्या तीन स्वतंत्र पेट्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही तीन स्वतंत्र पुस्तक पेट्या तयार करण्यात आल्या आहेत.* *विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि आकलनक्षमतेनुसार या पेट्यांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली आहेत.
शाळेतील शिक्षक रजेवर असल्यास उपलब्ध होणाऱ्या बुलेटिन तासिकेचाही उपयोग वाचनासाठी केला जात आहे. या तासिकेला वर्गावर जाणाऱ्या शिक्षकांना संबंधित वर्गासाठी पुस्तक पेटी उपलब्ध करुन दिली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक वाचण्यासाठी दिले जाते. तासिका संपल्यानंतर पुस्तके जमा करुन पुढील वर्गासाठी त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागत असून, त्यांना नियमित वाचनाची सवय लागण्यास मदत होत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, भाषिक कौशल्ये, कल्पनाशक्ती आणि विचारक्षमता विकसित होण्यास हातभार लागत आहे. स्वतः भेट दिलेली पुस्तके मित्र-मैत्रिणींना वाचण्यासाठी उपलब्ध करुन दिल्याचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळत आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या उपक्रमातून ‘वाढदिवसाला पुस्तक भेट देऊया आणि ज्ञानाचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवूया’ हा संदेश समाजापर्यंत* *पोहोचत आहे. पालकांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांच्या नियोजनातून सुयश विद्यालयात वाचनसंस्कृती अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Post Views: 12