सांगोला – राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रिम अर्थसहाय्याच्या निर्णयाचे सोलापूर जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी स्वागत करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत असताना त्यांना वेळेत मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि शेतीशी संबंधित समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सरकारच्या मदतीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, प्रधानमंत्री पीकविमा योजना आणि कृषी क्षेत्रासाठीच्या विविध सवलतींचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या अग्रिम अर्थसहाय्याची अंमलबजावणीही पारदर्शक आणि वेळेत व्हावी अशी अपेक्षा चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केली.
चौकट-
शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे
संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आणि ग्रामीण भागाला या परिस्थितीतून सावरण्यासाठी सहकार्य करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.