बार्शी – बार्शी शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर तहसील कार्यालयाजवळ तिरंगा झेंड्याखाली सुरु असलेले विरोधी पक्षातील २१ नगरसेवक आणि पाण्याने त्रस्त नागरिकांचे लाक्षणिक उपोषण गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी रात्री उशिरा विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्याशी मोबाईलवरुन संवाद साधत, ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा,’ असे आवाहन केले. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार दिलीप सोपल यांनीही आंदोलकांशी संपर्क साधून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.
बार्शीच्या पाणीप्रश्नावर मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनादरम्यान नगरपरिषद प्रशासनाकडून गूढ नाट्यमय घडामोडी घडल्या. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी या आंदोलनाची दखल घेत विरोधी पक्षनेते अक्कलकोटे यांच्याशी चर्चा केली. बार्शीच्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आंदोलकांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सोमवारी पाणीप्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात येणार असून, २३ ऑक्टोबरनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार दिलीप सोपल यांनीही आंदोलकांशी फोनवरुन संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांशी बार्शीच्या पाणीप्रश्नावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयांकडूनही जिल्हा प्रशासनाला तोडगा काढण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी आंदोलकांना सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाला मान देत आंदोलकांनी माध्यमांसमोर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी महसूल विभागाचे प्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासनाचे प्रतिनिधी आणि बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार उपस्थित होते. तहसीलदार एफ. आर. शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासंदर्भातील पत्र दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
Post Views: 10