बार्शी – नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीची आराधना, भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा जागर. या उत्सवात गरबा आणि दांडियाला विशेष महत्त्व असून, पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध नृत्य आणि संगीताच्या साथीने नवरात्रीचा आनंद द्विगुणित होतो. याच उत्साहात वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ, बार्शी संचलित महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय व मैत्रीण मंच यांच्यावतीने बार्शीत रविवार, दि. ११ ते बुधवार, दि. १४ ऑक्टोबरदरम्यान भव्य गरबा-दांडिया स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा उत्सव रंगला.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत महिलांना मनसोक्त गरबा-दांडिया खेळण्याची संधी देण्यात आली, तर शेवटच्या दोन दिवसांत विविध गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी गरबा-दांडियासह पारंपरिक हादगा-भोंडला कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंगळवारी लहान व मोठ्या गटांसाठी जोडी दांडिया आणि समूह दांडिया स्पर्धा पार पडल्या. बुधवारी विवाहित महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली होती. समूह दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. गरबा-दांडियासोबत हादगा-भोंडला आणि विविध उपक्रमांमुळे महिलांना सांस्कृतिक परंपरांचा आनंद घेण्याची संधी मिळाली.
मैत्रीण मंचच्या अध्यक्षा अरुणा मनगिरे, शारदा पानगांवकर शिल्पा मठपती, वंदना देवणे,सदस्या अपर्णा होनराव,माधुरी शिलवंत,स्वाती धारुरकर, प्रभा बेणे, उर्मिला निंबर्गीकर,अरुणा कल्याणी, महानंदा कोरे, लीना शेटे, संगीता बरिदे, रेणुका शेटे यांनी या उपक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.