श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दिनांक १५ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक समृद्धी रुजवणे आणि भारताचे लाडके माजी राष्ट्रपती, भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना उजाळा देणे या उद्देशाने ‘वाचन प्रेरणा दिवस’ मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आधुनिक भारताचे शिल्पकार आणि महान वैज्ञानिक डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी प्रतिमेचे पूजन करत कलाम यांच्या विचारांचे स्मरण केले. यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कु. राजनंदिनी कात्रे हिने वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करत वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यामागची भूमिका उपस्थितांसमोर मांडली. प्रास्ताविकानंतर झालेल्या मनोगत सत्रात कु. सानिका केमदरणे, कु. गायत्री कांबळे आणि कु. सायली घाडगे या विद्यार्थिनींनी ओघवत्या वाणीत आपले मनोगत व्यक्त केले. कलाम यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या ‘अग्नीपंख’ या आत्मचरित्रावर प्रकाश टाकतानाच, विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपले खरे मित्र बनवून वाचनाची सवय कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर प्रा. किरण माळी यांनी डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर आपल्या प्रभावशाली मनोगताद्वारे प्रकाश टाकला. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी आपले मोलाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. आपल्या मार्गदशनात त्यांनी सांगितले की, पुस्तके ही माणसाची सर्वोत्तम मार्गदर्शक आणि विचार समृद्ध करणारी गुरुकिल्ली आहेत. वाचनामुळे माणसाच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला नवी दिशा मिळते, त्यामुळे कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केवळ पदवी पुरते न वाचता अवांतर वाचन वाढवून जगाचे ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थितांचे आभार कु. रोहिणी ईरवाडकर हिने मानले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हजारे शामल आणि हत्तली अक्षता यांनी अत्यंत आकर्षक व प्रभावी शैलीत पार पाडले. या प्रेरणादायी सोहळ्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन डॉ. अक्षय शिंदे आणि प्रा. संकेत बिराजदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि उपस्थितांसाठी एक अत्यंत संस्मरणीय व ज्ञानवर्धक अनुभव ठरला.महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















