वैराग – ग्रामनिधीतून पूर्ण केलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामाचे थकीत बिल मिळावे यासाठी प्रशासनाकडे वारंवार खेटे मारूनही न्याय मिळत नसल्याने, त्रस्त झालेल्या बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील रहिवासी शहाजी निवृत्ती बगाडे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा थेट इशारा दिला आहे. दि. २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत थकीत बिल खात्यावर जमा न झाल्यास ३० ऑक्टोबर रोजी हे टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, शहाजी बगाडे यांनी सन २०२३ मध्ये मानेगाव येथे पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम पूर्ण केले होते. सदर काम ग्रामनिधीमधून करण्याचा ठराव संमत झाला होता. या कामाची मोजणी पाणीपुरवठा अधिकारी अजित वाघमारे यांनी पूर्ण केली आहे. मात्र, तरीही संबंधित ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामाचे बिल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप बगाडे यांनी केला आहे.
अधिकारी ब्लॉक करतात फोन; लोकशाही दिनातही दखल नाही!
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून या बिलासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यासंदर्भात लोकशाही दिनात तीन वेळा तक्रार अर्ज दाखल करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. इतकेच नव्हे तर, बिलाबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन व व्हॉट्सॲप कॉल केले असता, अधिकाऱ्यांनी आपला नंबर ‘ब्लॉक’ लिस्टमध्ये टाकल्याचा गंभीर आरोपही बगाडे यांनी निवेदनात केला आहे.
३० ऑक्टोबरला आत्मदहनाचा इशारा
प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शहाजी बगाडे यांनी अखेर प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कामाची थकीत रक्कम बँक खात्यावर जमा न झाल्यास, ३० ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर स्वतः आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे घडणाऱ्या अनुचित प्रकारास सर्वस्वी जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी अर्जात नमूद केले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषद वर्तुळात व बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.