सोलापूर – जोडभावी पेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेली आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली मंगळवार पेठ पोलीस चौकी सध्या अत्यंत बिकट व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. या चौकीची अंतर्गत बाजू पूर्णपणे पडण्याच्या (कोसळण्याच्या) बेतात आली असून, येथे कार्यरत पोलीस कर्मचारी आणि नागरिक जीव मुठीत धरून वावरत आहेत. कोणतीही मोठी जीवितहानी किंवा दुर्घटना घडण्यापूर्वी या चौकीचे युद्धपातळीवर अंतर्गत मजबुतीकरण व दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी आज अभिनव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदरणीय परदेसी यांना साकडे घालत तातडीचे निवेदन देण्यात आले.
चौकीचे पत्रे पूर्णपणे जीर्ण झाले असून, भिंतींचे प्लास्टर निखळत आहे. पावसाळ्यात आणि सद्यस्थितीत ही इमारत आतून अत्यंत खिळखिळी झाली आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे, यासंदर्भात संस्थेने मागण्या केल्या आहेत.
तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरण करण्यात यावे. अंतर्गत भागातील खराब झालेले प्लास्टर काढून नवीन प्लास्टर व दर्जेदार रंगरंगोटी करावी. पत्रे बदलून त्या ठिकाणी नवीन मजबूत पत्रे बसवावेत. दरवाजे आणि वॉशरुमची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे.
यावेळी संस्थापक/अध्यक्ष मीनल दास, संपर्क प्रमुख सरोजिनी मकाई, जिल्हाध्यक्ष अरुणा जाधव, उपाध्यक्ष स्वाती घंटे, शहर अध्यक्ष जयश्री रानसरजे, कार्याध्यक्ष सुनिता घंटे, योगेश्री निंबाळे आदी उपस्थित होते.























