सोलापूर : दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा मोठ्या उत्साहात जपली जाते. मात्र, ही पाने गोळा करताना आपट्याच्या झाडांची होणारी तोड आणि नव्या वृक्षांची लागवड करण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे हा वृक्ष हळूहळू दुर्मीळ होत आहे. आपट्याच्या घटत्या संख्येचा परिणाम या वृक्षावर अवलंबून असलेल्या फुलपाखरांच्या जीवनचक्रावरही होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी, येथील नृसिंह विद्यालयात आपट्याच्या वृक्षांची लागवड करून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
दसरा सणाला आपटा आणि शमी या वृक्षांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. पांडवांनी अज्ञातवासापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती, अशी पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी या वृक्षांचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे. आपट्याची पाने सोने म्हणून वाटून आपुलकी व्यक्त केली जाते; मात्र ही परंपरा जपताना वृक्षांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.
आपटा हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. काही फुलपाखरांच्या प्रजातींच्या जीवनचक्रात या वृक्षाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आपट्याची झाडे कमी झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या प्रजातींच्या अधिवासावरही परिणाम होऊ शकतो.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक, म्हाळप्पा कोकरे, राजेश वाघमोडे, किरण सरवळे, पिरप्पा कोळी, राजेश केकडे, शहाबाज मकानदार , दीपक करकी,किशोर गुंड, गोरखनाथ घोडके, श्रीधर देशमुख, चेतन झाडे, वृक्षारोपणा वेळेस उपस्थिती होते.























