सोलापूर – कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी वळसंग येथील SRC प्रतिष्ठान आणि डॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील वळसंग टोलनाका येथे मोफत औषधोपचार, पिण्याचे पाणी, चहा व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी वळसंगची ग्रामदैवता श्री रामलिंग चौडेश्वरी माता आणि आई तुळजाभवानी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. रात्रीच्या वेळी अनवाणी पायाने तुळजापूरकडे निघालेल्या भाविकांना थकवा, तहान आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन त्यांना विसावा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम SRC प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागराज ऊर्फ अप्पू कोंडे यांच्या पुढाकाराने गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे.
डॉ. सूर्यप्रकाश कोठे म्हणाले, आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी श्रद्धेने पायी जाणाऱ्या भाविकांची सेवा करणे हे मोठे पुण्यकर्म आहे. त्यांच्या प्रवासात पाणी, चहा आणि औषधोपचार यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हीच खरी भक्ती आहे. अशा सेवाभावी उपक्रमांसाठी अधिकाधिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी माजी सरपंच श्रीशैल दुधगी, युवा हॉटेल उद्योजक सिद्धेश्वर मोरे, वेदमूर्ती पंडित हिरेमठ, बसवराज कलशेट्टी, पत्रकार इरण्णा जुजगार, कल्लाप्पा म्हेत्रे, मुक्तार कुरेशी, शंकर खैराटे, सोमनाथ हुणचळगी, विश्वनाथ मोटगी, सिध्दाराम सुरपुरे,चेतन अंकद, प्रेम खंबद, महेश खैराटे, श्रीशैल काबणे, सिद्धारूढ म्हेत्रे, सिद्धारूढ धडुते, राकेश मिसे,प्रमोद म्हेत्रे, आनंद सुरपुरे, बसवराज नीलगार, प्रशांत देगाव, कल्लाप्पा चनशेट्टी यांच्यासह SRC प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदो उदे’च्या जयघोषात भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.





















