बार्शी – दिवाळीच्या सणानिमित्त बार्शी तालुका पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. चोरीस गेलेले व हरवलेले १२ लाख ५७ हजार रुपये किमतीचे तब्बल ४५ मोबाईल शोधून ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून मोबाईल परत मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५९ गावे असून, नागरिकांचे प्रवासादरम्यान मोबाईल गहाळ होणे अथवा चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन शोधमोहीम राबवली. या पथकाने सेंट्रल ईक्युपमेंट आयडेंटी रजिस्टर पोर्टल तसेच विविध तांत्रिक बाबींच्या आधारे मोबाईलचा शोध घेतला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांतूनही मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. शोधून काढलेले ४५ मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप आणि प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. या मोहिमेत सिद्धेश्वर लोंढे, ओमप्रकाश दासरी, सागर वाकळे, राहुल सोनकर यांनी परिश्रम घेतले.
Views: 10