धाराशिव : नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ७० व्या राष्ट्रीय शालेय ज्युडो स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याची कु. सई गणेश साप्ते हिने सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुद्रा सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय स्पर्धेत मुद्रा सहकारी पतसंस्थेचे संचालक अविनाश दिगंबर शिंदे यांचे चिरंजीव आरंभ शिंदे यांनीही सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दोन्ही खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर धाराशिव जिल्ह्याची मान उंचावली आहे.
या खेळाडूंना मार्गदर्शन करून घडविणारे त्यांचे प्रशिक्षक गुरुवर्य अनंत केंद्रे सर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. खेळाडूंच्या यशामागील मेहनत आणि मार्गदर्शकांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मुद्रा सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या या सत्कार समारंभाला संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय विष्णू भालेकर, उपाध्यक्ष सोमलिंग शंकर खरे, सचिव उषा विनायक काळे-शिंदे, संचालिका रश्मी किशोर पाटील, संचालिका प्रिती भागवत मेटे, संचालिका कल्पना बालाजी पवार, संचालक दयानंद आनंद चव्हाण, संचालक विनोद महादेव शेरकर, संचालक बलराम रमेशराव माने, संचालक सुरेश युवराज कोळी आणि संचालक प्रमोद प्रभाकर देशपांडे पतसंस्थेचे व्यवस्थापक खंडेराव कवडे लिपिक राजपाल कांबळे
यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा मुद्रा सहकारी पतसंस्थेचा हा उपक्रम निश्चितच इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Views: 13