सोलापूर : शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी जशी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांची गरज असते, तशीच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ग्रंथालये आणि पुस्तकांची आवश्यकता आहे. वाचनामुळे विचार प्रगल्भ होतात, माणसांमध्ये सहिष्णुता निर्माण होते आणि समाजाला योग्य दिशा मिळते. त्यामुळे वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालयांची चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन तथा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांनी केले.
जागृती ॲडव्हान्स लायब्ररीचा उद्घाटन समारंभ शनिवारी सात रस्ता परिसरातील रायलीवाला कॉम्प्लेक्स येथे श्रीकांत मोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर,
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ईरा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश नारायणकर, जागृती ॲडव्हान्स लायब्ररीचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, मार्गदर्शक विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीकांत मोरे पुढे म्हणाले, भारतासारख्या विशाल देशात ग्रंथालयांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. महाराष्ट्रातही वाचनालयांची उपलब्धता मर्यादित आहे. ग्रामीण भागात एखादे वृत्तपत्र अनेक जण वाचतात; मात्र प्रत्येकाला आवश्यक ती पुस्तके आणि ज्ञानसाहित्य सहज उपलब्ध होत नाही. वाचनाची आवड समाजात आहे, परंतु त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पुस्तक वाचण्यासाठी पैसे देण्याऐवजी पुस्तक वाचणाऱ्याला पैसे मिळण्याची संकल्पना घेऊन सुरू झालेली जागृती ॲडव्हान्स लायब्ररी ही अभिनव संकल्पना आहे. डॉ. बाबासाहेबांनी ग्रंथालयांचा उपयोग करून प्रचंड ज्ञानसंपादन केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी केलेला अभ्यास, संशोधन आणि वाचन हे त्यांच्या ज्ञानसाधनेचे प्रतीक आहे. साहित्य माणसाला संयम, विचारांची प्रगल्भता आणि एकमेकांशी आदराने वागण्याची शिकवण देते.
विक्रम खेलबुडे म्हणाले, जागृती ॲडव्हान्स लायब्ररीच्या माध्यमातून सोलापूरमधील वाचकांची ज्ञानाची भूक निश्चितच भागेल, असा विश्वास आहे. शासनमान्य वाचनालये आणि ग्रंथालयांची संख्या मोठी असली, तरी विविध अडचणींमुळे वाचनसंस्कृतीला अपेक्षित चालना मिळत नाही. अशा परिस्थितीत हा उपक्रम कौतुकास्पद आहे. वाचनसंस्कृतीला नवी दिशा देईल, असा विश्वास विक्रम खेलबुडे यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुहास उघडे यांनी केले. प्रास्ताविक विजय गायकवाड यांनी केले, तर आभार सोमनाथ गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, लेखक, साहित्यिक, वाचक आणि पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुस्तक वाचनासाठी पैसे मिळण्याची
अभिनव संकल्पना : भालशंकर
अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, पुस्तक वाचणाऱ्याची मस्तके सशक्त होतात आणि सशक्त मस्तके कोणाचेही गुलाम होत नाहीत. पुस्तक वाचनासाठी पैसे मिळण्याची संकल्पना ही भारतातील ग्रंथालय चळवळीला नवी दिशा देणारी आहे. एका फोनवर आवडीचे पुस्तक घरपोच मिळण्याची सुविधाही या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. अशा उपक्रमांना समाजाने आर्थिक नव्हे, तर सक्रिय सहभागाच्या माध्यमातून पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रंथालयासाठी मान्यवरांकडून
पुस्तकांचा संच भेट
यावेळी श्रीकांत मोरे यांनी ग्रंथालयासाठी पुस्तकांचा संच भेट दिला. महापालिका चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन साखरे आणि मित्रपरिवाराच्या वतीने पुस्तकांचा संच भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
———-
Views: 184