सोलापूर : आगामी काळात सोलापूर शहराची ओळख मोफत बससेवेसाठी जगभरात निर्माण व्हावी आणि सोलापूर हे मोफत बससेवेचे आदर्श मॉडेल बनावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी सांगितले.
आप्पाजी द्वारकोजी मदने फाऊंडेशनच्या वतीने सोलापूरकरांसाठी दोन मार्गांवर मोफत प्रवासी बससेवा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. शनिवारी महापालिका आवारात या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या मोफत सार्वजनिक बससेवेचे उद्घाटन महापौर विनायक कोंड्याल व आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, अप्पाजी मदने फाउंडेशनचे महादेव आप्पाजी मदने, उत्तम आप्पाजी मदने,बाळासाहेब मदने अनिल कानडे, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे यांच्यासह नगरसेवक
सात्विक बडवे, अक्षय अंजीखाने, नगरसेवक बिजू प्रधाने, प्रशांत पल्ली, व्यंकटेश कोंडी, युवराज सरवदे, रवी कयावले, सिद्धेश्वर कमटम, बसवराज केंगणाळकर, , नगरसेविका कलावती गदगे, संगीता जाधव, सारिका चाबुकस्वार, उपअभियंता सारिका आकुलवार आणि अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. बसचा संपूर्ण खर्च फाऊंडेशन करणार आहे.
राजेंद्र मदने म्हणाले, सोलापूरमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करताना महापालिकेच्या परिवहन विभागाची जबाबदारी सांभाळण्याचीही संधी मिळाली. त्यावेळी तोट्यात असलेली परिवहन बससेवा कामगार आणि शहरवासीयांच्या सहकार्याने नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला. कामगार आणि कष्टकरी वर्गाचे शहर असलेल्या सोलापुरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती जवळून अनुभवली. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचीही परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगली बससेवा मिळावी, या उद्देशाने काम केले.याच भावनेतून आता आप्पाजी द्वारकोजी मदने फाऊंडेशनच्या माध्यमातून निलम नगर आणि राजेंद्र चौक या दोन मार्गांवर मोफत बससेवा सुरू केली आहे. या बसचा दैनंदिन संपूर्ण खर्च फाऊंडेशन उचलणार असून प्रवाशांना ही सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहे. सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पुन्हा चांगले दिवस यावेत आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आ. सुभाष देशमुख म्हणाले, राजेंद्र मदने यांनी आरटीओ आणि परिवहन अधिकारी म्हणून सोलापूरकरांसाठी उल्लेखनीय काम केले. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावताना त्यांनी अनेक गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. सेवानिवृत्तीनंतरही सोलापूरच्या हिताचा विचार करून त्यांनी मोफत बससेवेचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांचे हे योगदान कौतुकास्पद आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांनी राजेंद्र मदने यांच्या सोलापूरप्रेमाचे कौतुक करत या उपक्रमाला महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनीही फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले.
Views: 191