जेऊर – करमाळा तालुक्यातील केम व परिसरातील ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रहार संघटनचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर साहेब यांच्याकडे विविध आरोग्यविषयक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यामध्ये केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून त्याठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली.
केम व परिसरातील अनेक गावांतील नागरिक आरोग्य सेवांसाठी केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. मात्र, आपत्कालीन रुग्ण, गरोदर माता, लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांना पुढील उपचारांसाठी इतर शहरांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे केम येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच करमाळा तालुक्यातील वडशिवणे, गुळसडी, पोपळज, उमरड आणि सावडी येथील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही आवश्यक कर्मचारी वर्गाअभावी नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत.
त्यामुळे या सर्व आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करून ही उपकेंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करावीत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
या दोन्ही महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली असता, त्यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून केम येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याच्या प्रस्तावासह संबंधित आरोग्यविषयक प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून, केम येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू होईपर्यंत प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे..