टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळावा आणि जिल्ह्यातील भाजपच्या निष्ठावंत, ज्येष्ठ व सक्षम नेतृत्वाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाची संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे नेते समाधान केचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री दिले जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत असून स्थानिक नेतृत्वाला निर्णयप्रक्रियेत योग्य स्थान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात भाजपा सक्रिय सदस्य समाधान केचे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. सन २०१९ नंतर जिल्ह्याला मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व आणि हक्काचे पालकमंत्रीपद मिळाले नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या समृद्ध परंपरा असलेल्या सोलापूर जिल्ह्याने देशाला, राज्याला अनेक दिग्गज नेते दिले आहेत. असे असतानाही जिल्ह्याला मंत्रिमंडळातील योग्य मंत्रीपदासह पालकमंत्री पदापासून वंचित राहावे लागत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याची टंचाई, शेतीसमोरील विविध समस्या, जलसिंचनाचे प्रलंबित प्रकल्प आणि औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज अशा अनेक आव्हानांचा सामना जिल्हा करीत आहे. या प्रश्नांची जाण असणारे आणि स्थानिक परिस्थितीशी परिचित असलेले नेतृत्व जिल्ह्याला मिळणे आवश्यक आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.
सोलापूर जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांना दिलासा देण्यासाठी तसेच जिल्ह्याचा राजकीय सन्मान पुनर्स्थापित करण्यासाठी स्थानिक पालकमंत्री असणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत व ज्येष्ठ आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देऊन सोलापूरचे पालकमंत्रीपद देण्यात यावे, अशी आग्रही मागणी केचे यांनी केली आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सोलापूर जिल्ह्याला न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
Views: 222