सोलापूर – गावाच्या विकासासाठी केलेल्या नियोजनबद्ध कामांची शासनदरबारी दखल घेतली गेली की त्याचे फलित किती मोठे असू शकते, याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्याने आणून दिला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जाहीर झालेल्या उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये सोलापूर जिल्ह्याने पहिल्या तीनही क्रमांकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत तब्बल ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. करमाळा तालुक्यातील उंदरगावने ३० लाखांचे द्वितीय, तर सांगोला तालुक्यातील चिणके ग्रामपंचायतीने २० लाखांचे तृतीय पारितोषिक मिळवले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या तीनही क्रमांकांवर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवड झाल्याने ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात जिल्ह्याने आपली वेगळी छाप पाडली आहे.
ग्रामविकास विभागाने शुक्रवारी शासन निर्णयाद्वारे या पुरस्कारांची घोषणा केली. त्यामुळे चिंचणी, उंदरगाव आणि चिणके या गावांमध्ये आनंदाचे वातावरण असून, या यशामुळे जिल्हा परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या अभियानात ग्रामपंचायतींच्या कामांचे केवळ कागदोपत्री मूल्यमापन न करता टप्प्याटप्प्याने परीक्षण करण्यात आले. तालुकास्तरीय समितीने प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी पाठवले. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीच्या परीक्षणातून पात्र ग्रामपंचायतींची विभागस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली. या संपूर्ण प्रक्रियेनंतर प्राप्त गुणांकनाच्या आधारे अंतिम पुरस्कार जाहीर करण्यात आले.
या पुरस्कारांचे महत्त्व केवळ आर्थिक बक्षिसांपुरते मर्यादित नाही. ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांना मिळालेली ही शासकीय मान्यता असून, भविष्यात गावांच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, लोकाभिमुख प्रशासन आणि मूलभूत सेवांच्या विस्तारासाठी ही प्रेरणा ठरणार आहे. विशेषतः ५० लाख, ३० लाख आणि २० लाखांच्या पारितोषिकांमुळे संबंधित गावांना विकासकामांसाठी अतिरिक्त बळ मिळणार आहे. या यशामागे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, पुरस्कार वितरणासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठी ग्रामविकास व पंचायतराजमंत्री तथा पालकमंत्री आणि राज्यमंत्री यांना निमंत्रित करून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
चौकट
सोलापूर जिल्ह्याने पहिल्या तीनही क्रमांकांवर मिळवलेले यश हे ग्रामीण विकासाच्या कामांना मिळालेली मोठी पावती मानली जात असून, आता या पुरस्काराच्या रकमेतून गावांच्या विकासाला आणखी किती गती मिळते, याकडे लक्ष लागले आहे.