राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही संभ्रम नाही. असलाच तर ज्येष्ठ नेते शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. आपण शरद पवार यांच्याबरोबरच आहोत, पण विकासकामांसाठी अजित पवार यांच्याकडे जाण्यात काहीही गैर वाटणार नाही असे ते म्हणाले.
टिळक रस्त्यावरील एका क्लिनिकच्या उदघाटनासाठी डॉ. कोल्हे आले होते. आपण कुठे जायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही असे सांगणारे आमदार चेतन तुपे हेही त्यांच्यासमवेत होते. त्यावेळी पत्रकारांबरोबर डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला. शरद पवार यांची बीडला सभा सुरू आहे. तुम्ही इथे कसे, की विचार बदलला आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी हा माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे यावे लागले असे सांगितले. विचार बदलण्याचा प्रश्नच नाही. संसदेतील भाषणात तसेच नंतरही आपण कुठे आहोत ते स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विषयावर जे काही सुरू आहे ते चुकीचे आहे. कार्यकर्ते,नागरिक किंवा इंडिया आघाडीतील अन्य पक्ष यांच्यात काही संभ्रम असलाच तर तो शरद पवार नक्की दूर करतील असे ते म्हणाले.