पंढरपूर : श्रीक्षेत्र पंढरपूर शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी भक्तीसागर ६५ एकर परिसरात ५०० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या पुढाकाराने आणि पंढरपूर नगरपरिषदेच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड, सोलापूर यांनी ५०० लोखंडी वृक्षसंरक्षक जाळ्या (ट्री गार्ड) देऊन मोलाचे सहकार्य केले. विविध संस्था, प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींच्या एकत्रित सहभागातून ‘हरित पंढरपूर, स्वच्छ पंढरपूर’ या संकल्पनेला बळ मिळाले आहे.
पंढरपूर ही संतांची भूमी आणि लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी-कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना आणि भाविकांना भविष्यात सावली मिळावी, शहरातील हरित क्षेत्र वाढावे आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या उदात्त हेतूने भक्तीसागर ६५ एकर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. केवळ वृक्ष लावणे नव्हे, तर त्या वृक्षांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करून त्यांना मोठे करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड, सोलापूर, पंढरपूर नगरपरिषद, SVERI कॉलेज, पंढरपूर, वृक्षदायी संस्था आणि वृक्षप्रेमी ग्रुप, पंढरपूर यांनी सहभाग घेतला. विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे.
या कार्यक्रमास किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडचे COO सी. रमेश, HR विभागप्रमुख ऋषिकेश कुलकर्णी, वरिष्ठ व्यवस्थापक अमित राठोड, वरिष्ठ अधिकारी नवीन सांगा व त्यांची टीम उपस्थित होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजी मोरे महाराज, अतुल बक्षी, विनोद साठे, मोहन हौसेकर, SVERI संस्थेचे विश्वस्त डॉ. सूरज रोंगे, जळगावकर महाराज, प्रवीणकुमार घम, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि स्वप्निल मोरे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
SVERI संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, सचिव डॉ. सूरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. मुकुंद पवार, उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे डॉ. अभिषेक एम. एस. व श्री. रविराज मधेकर, प्रथम वर्ष विभागप्रमुख व NSS कार्यक्रम अधिकारी श्री. अमोल चौंडे, ENTC विभागप्रमुख डॉ. नीता कुलकर्णी तसेच NSS विभागातील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
वृक्षप्रेमी ग्रुप, पंढरपूरचे अॅड. सुनील वाळुंजकर, श्री. सोमनाथ होरणे तसेच वृक्षदायी संस्थेचे श्री. रवी सर्वगड आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. याशिवाय विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही सहकार्य केले.
वृक्ष म्हणजे केवळ हिरवळ नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांसाठी जीवनाचा आधार आहे. आज लावलेले रोप उद्या एखाद्या वारकऱ्याला सावली देईल, एखाद्या भाविकाला विसावा देईल आणि पंढरपूरच्या पर्यावरणाला नवे जीवन देईल. या भावनेतून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड, पंढरपूर नगरपरिषद, SVERI कॉलेज आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहकार्याने उचललेले हे पाऊल पंढरपूरला हरित, स्वच्छ आणि सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा… वारकऱ्यांना सावली द्या आणि हरित पंढरपूर घडवा!’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
Post Views: 10