राँगसाइडने येणाऱ्या एसटी बसची रिक्षा आणि दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील शेतकरी जागीच ठार झाला आहे. ही घटना दि. २२ मे रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट शहरातील ए- वन चौकात घडली. याबाबत उत्तर पोलिस ठाण्यात बस चालक आरोपी संतोष मित्रखेत्री (रा. जेऊर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोणदे (वय ५४ रा. बोरी रामपूर) यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे (वय ४२) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच रिक्षाचालक ताजोद्दीन फकीर अहमद नाईक (वय ३५ रा. अक्कलकोट), मारुती डोंगरे (वय ७०), महादू जानक ताफेकर (वय ७५), अर्जुन तुळशीराम शेरकर (वय ७५), कोमल मधू ताफेकर (वय ६५, सर्व रा. जुन्नर, पुणे) हेही जखमी झाले आहेत. जखमींना सोलापुरातील सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मयत लक्ष्मण कोणदेंच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे, दोन भावंडे, चार बहिणी असा परिवार आहे. दरम्यान जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते.
दर्शन करून रिक्षातून अक्कलकोट बसस्थानकाकडे निघाले होते. अक्कलकोट बसस्थानकाकडून बस नेहमीप्रमाणे एवन चौकात उजव्या बाजूने बायपास रोडकडे जाणे आवश्यक होते. चालक तसा प्रयत्न करत होता. मात्र गिअर खाली पाण्याची रिकामी बाटली अडकल्याने ब्रेक लागला नसल्याचे सांगण्यात आले