सोलापूर : आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील जन्मस्थळ आणि ऐतिहासिक दसरा चौक येथे नियोजित ‘शाक्य संघ’ तसेच माता रमाई महिला ब्रिगेडच्या वतीने बिगुल वाजवून अनोखी मानवंदना देण्यात आली. विशेष ड्रेस कोडमध्ये सहभागी झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पत्नींनी मानवंदना देत परिसर देशभक्तीच्या आणि सामाजिक समतेच्या घोषणांनी दणाणून सोडला.
यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड आणि मराठा सेवा संघाचे वसंतराव मुळीक यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो”, “छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो”, “भारतीय संविधानाचा विजय असो”, “भारतीय लोकशाहीचा विजय असो” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या “राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा” या आवाहनाचा आदर्श घेत शाक्य संघाच्या वतीने नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुमारे २ हजार लाडूंचे वाटप करण्यात आले. सुमारे १०० किलो मिठाई वितरित करून जयंतीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सोलापूरसह इतर जिल्ह्यातून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटक अशोककुमार दिलपाक, अरुण ओहळ यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला.
Post Views: 8