सोलापूर – खबरी कडून मिळालेल्या माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बोरामणी शिवारात तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पर राज्यातून विक्रीसाठी आणलेला सव्वा 7 लाखाचा सव्वा 36 किलो गांजा जप्त केला आहे.
सचिन लक्ष्मण बनसोडे (वय 39 वर्षे, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ) एकनाथ नामदेव लेंढवे (वय 33 वर्षे, रा. मेथवडे, ता. सांगोला ) आणि अनिल लक्ष्मण रोंगे ( रा. खर्डी, पंढरपूर, ता. पंढरपूर ) अशी अटक करण्यात आलेल्या त्या आरोपींची नावे आहेत .
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हयामध्ये अंमली पदार्थ गांजा ची वाहतुक व विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे तपासादरम्यान बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि जगदलपुर (राज्य छत्तीसगड )येथुन अंमली पदार्थ गांजा आणून ते विक्री करण्याकरीता काही आरोपी हैदराबाद महामार्गावरील बोरामणी शिवारातील हॉटेल वैष्णवी जवळ येणार आहेत . माहितीप्रमाणे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा लावला असता हॉटेल वैष्णवी समोर वरील आरोपी सचिन बनसोडे व एकनाथ लेंडवे हे दोन मोठया बॅगासह उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. दोन्ही बॅगांची तपासणी केली असता 2 प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकूण 36 किलो 270 ग्रॅम वजानाचा अंमली पदार्थ गांजा (किंमत – 7लाख 25 हजार 400 रु. ) मिळून आला .
याबाबत त्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता सदरचा अंमली पदार्थ गांजा हा जगदलपूर राज्य छत्तीसगड येथून विकत आणला असून तो यातील आरोपी अनिल रोंगे यास विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अनिल रोंगे याची माहिती काढून सदर गुन्हयाचे कामी मोहोळ येथून त्याला अटक केली आहे.
दरम्यान याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना नऊ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ हे करीत आहेत .
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक वियज कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सपोनि भिमगोंडा पाटील, फौजदार ख्वाजा मुजावर, सफौ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे, अनिश शेख, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतिष बुरकुल यांनी पार पाडली आहे.
Post Views: 6