सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने मंगळवारी शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई केली. मार्केट यार्ड, बोरामणी नाका ते अशोक चौक तसेच गुरुनानक चौक ते महावीर चौक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.
या कारवाईदरम्यान विविध प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामध्ये चार चारचाकी लोखंडी हात गाड्या, सहा लोखंडी बोर्ड, एक लोखंडी टेबल अँगल, एक लोखंडी स्टूल, चार प्लास्टिक टेबल, १३ प्लास्टिक खुर्च्या आणि एक ताडपत्रीचा समावेश आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता अविनाश वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण प्रतिबंधक विभागप्रमुख सोपान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता गणेश काकडे, राजकुमार कांबळे यांच्यासह पथकाने कारवाई केली.
मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
—-
Post Views: 16