बार्शी – शहरात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बार्शी शहर पोलिसांनी अवैध दारु वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत दुचाकीवरुन देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या अमित अशोक तुपेरे (वय ३२, रा. सौंदरे, ता. बार्शी) याच्याकडून ११ हजार १०० रुपये किंमतीचा दारु साठा जप्त करण्यात आला.
शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सोलापूर रोडकडून जनसेवा हायस्कूलच्या दिशेने एका दुचाकीवरुन संशयास्पदरीत्या काहीतरी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करुन चिंतामणी हॉटेलसमोर दुचाकीस्वाराला थांबवले.
चौकशीमध्ये त्याने आपले नाव अमित तुपेरे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील स्कूटी क्रमांक एमएच-१३-ईए-३७२० वरील खाकी बॉक्स व पिशवीची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. त्यामध्ये टॅंगो पंच कंपनीच्या १८० मिलीच्या ९६ बाटल्या, ऑफिसर चॉईसच्या सहा, मॅकडोनाल्ड नं. १ च्या सहा आणि क्लासिक गोल्डच्या सहा बाटल्या आढळून आल्या. या सर्व दारुची एकूण किंमत ११ हजार १०० रुपये आहे.
दारु वाहतुकीचा परवाना तसेच दारु कोठून आणली याबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती न मिळाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी दारु साठा जप्त करुन नमुने घेतले आहेत. त्याचबरोबर ४० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्ता हणमंत सोमवाड यांच्या फिर्यादीवरुन अमित तुपेरे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
Post Views: 27