सोलापूर – सोलापूर महानगरपालिका संचलित प्रशाला क्र. १ कॅम्प येथे प्रवेशोत्सव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. महेश देवकर , नगरसेवक नरसिंह असादे, नगरसेविका सौ. श्वेता खरात तसेच नगरसेविका सौ. कदम उपस्थित होत्या.
कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. मंगला मोरे व उपाध्यक्ष सौ. जोगदंड यांच्या हस्ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश तसेच पाठ्यपुस्तक मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.
यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व त्यांना शिक्षणाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते बाळकृष्ण मोरे, गजानन हंचाटे, मुख्याध्यापिका सौ. हंचाटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. रंडाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. खरबस पी. ए. यांनी केले.