राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सरकारमधील सहभागाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला आहे. फडणवीसांच्या विरोधानंतर अजित पवार गट बॅकफूटवर गेला असून स्पष्टवक्ते , रोखठोक भूमिका घेणारे नेते अशी ओळख असलेले नेतृत्व सहकाऱ्याची बाजू घेताना अडखळत आहे असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या महायुती सरकारमधील सहभागावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या सरकारमधील सहभागाला जोरदार विरोध केल्याने अजित पवार गटाची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि देशद्रोह्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाप्रकरणी जामिनावर सुटका झालेले नवाब मलिकांनी हिवाळी अधिवेशनात थेट सत्ताधारी बाकांवर हजेरी लावली. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध करताच अजित पवार गटानेही नवाब मलिक यांच्याबाबत ठोस भूमिका घेणे टाळले. यावरुन आता रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना टोला लगावला आहे.
प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्टवक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वतःच्याच सहकाऱ्याची बाजू मांडताना अडखळत आहे, हे बघून अत्यंत वाईट वाटतं. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व आवडतं. स्वयंभू नेतृत्व त्यांना नको असतं म्हणूनच त्यांच्याकडून लोकनेते संपवले जातात. आता वैचारिक मतभेद असले तरी एक क्षमता असलेला लोकनेता भाजपच्या रणनीतीचा शिकार होत आहे, याचं दुःख सर्व सहकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही नक्कीच आहे!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रावादीतील बहुतांश आमदारांची साथ मिळाली. मात्र, तेव्हापासून आमदार रोहित पवार आजोबा शरद पवार यांच्यासाठी खिंड लढवताना दिसून येत आहेत. नवाब मलिक यांच्या सरकारमधील सहभागावरुन पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारताच अजित पवारांनी चिडचिडही केली होती. त्यावेळी अजित पवार यांनी नवाब मलिक यांनी भूमिका मांडल्यावर आम्ही पक्षाची भूमिका मांडू अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, अजितदादांच्या या सौम्य उत्तरामुळे अजित पवार गट बॅकफूटवर गेल्याची चर्चा विधानभवान परिसरात ऐकायला मिळाली.