सोलापूर – कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधाच्या विरोधात कृषी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पुकारलेले संपात कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या “लॅपटॉप परत, सिमकार्ड परत” करून आंदोलन आता चिघळले आहे. हा नवीन आकृतिबंध रद्द झाल्याशिवाय आंदोलन स्थगित होणार नाही, असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघने घेतला आहे.
सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना, कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप व ऑनलाइन कामांसाठी दिलेले सिमकार्ड परत केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. याचा थेट परिणाम पीक विमा, दुष्काळ निधी व पीक नुकसानीच्या पंचनाम्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ई-पीक पाहणी, ऑनलाइन पंचनामा, विविध योजनेचे अनुदान वाटप यासारखी सर्व कामे लॅपटॉप आणि सिमवर अवलंबून आहेत. ती यंत्रणाच बंद झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरकारी मदत लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटात असताना, आता प्रशासकीय कामे ठप्प झाल्याने त्यांचे हाल अधिक वाढले आहेत.
शासनाने जाहीर केलेल्या नव्या आकृतिबंधामुळे कार्यालयात एसीमध्ये बसून व अतांत्रिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढून, क्षेत्रीय स्तरावरील गाव पातळीवर काम करणारी तांत्रिक पदे कमी होऊन इतर सहाय्यक व उप कृषी अधिकारी यांच्यावर बोजा वाढणार असल्याचा आरोप कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केला आहे. शासनाने मंत्रिमंडळात क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी अधिकारी यांना विश्वासात घेऊन योग्य ते निर्णय लावून तात्काळ हा नवीन आकृतिबंध रद्द करून तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Post Views: 12