
माढा : जून महिन्यापासून सगळीकडे शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते त्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले डोमेसेल सर्टिफिकेट व जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते ही कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालक माढा तहसील कार्यालयात येतात परंतु या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांची आर्थिक लूट होत असल्याचे कळते. त्यामुळे माढा तहसीलदार संजय भोसले यांना सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी या गोष्टी रोखण्यासाठी व संबंधित अधिकारी व दलालांवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले देताना माढा तहसील ऑफिसमध्ये खुलेआम भ्रष्टाचार होत आहे तसेच
चालू वर्षी शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने शालेय प्रवेश घेण्याकरीता
विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट अशी अनेक कागदपत्रे महसूल विभागातून घ्यावी लागतात. सदरचे दाखले काढण्याकरीता विद्यार्थ्यांना माढा तहसिल कार्यालयात यावे लागते. परंतू सदर ठिकाणी शासकीय सेतु सुविधा असताना व तेथे माफक दरात शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत दाखले देण्याचे काम करणे अपेक्षीत असताना माढा तहसिल कार्यालयाच्या आवारामध्ये दलालांचा प्रचंड मोठा सुळसुळाट झाला आहे. सदर दलाल हे विद्यार्थ्यांना व त्यांचे पालकांना गळ घालून त्यांचेकडून विविध मार्गातून अनावश्यक मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन दाखले देण्याचे काम करतात. तसेच तहसिल कार्यालयातील सर्कल अधिकारी हे दलालामार्फत पैशांची मागणी करतात. यामध्ये शासकीय यंत्रणाचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे जनतेची आर्थिक लुट होत आहे. या कारणांमुळे विद्यार्थ्यांना व जनतेस नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दलाल व शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारी लूट तात्काळ थांबवून भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी शंभू साठे, शरद वारगड, संदीप साठे, राजू शर्मा, संजय आवारे, विजय चवरे ,गौतम शिंदे व इतर नागरिक उपस्थित होते.
Post Views: 7