सोलापूर – पत्नीला पोटगीची रक्कम वाढवून दे या कारणावरून एका पतीला व त्याच्या भावाला लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याप्रकरणी पत्नी, मेव्हणा, सासूसह चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनम रोहन पवार, राज श्रीपाद पवार, राकेश श्रीपाद पवार आणि संगीता कांबळे (रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत रोहन शामकुमार पवार( रा. अभिमानश्री नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी व आरोपी पुनम हे पती पत्नी असून ते सध्या विभक्त राहतात व त्यांचे कोर्टामध्ये घटस्फोट प्रकरण प्रलंबित आहे.यातील फिर्यादी हे दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वा चे सुमारास, सिक्युअर हॉस्पीटल जवळ, वसंत विहार भागात असताना वरील आरोपींनी पत्नी पुनम हिला पोटगीचे ठरलेले पैशापेक्षा जास्त पैशाची फिर्यादीकडे मागणी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे डोळ्यात चटणी पावडर टाकुन लोखंडी रॉडने डोक्यात मारुन जखमी केले. यावेळी फिर्यादीचा भाऊ रोहित हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला देखील सर्व आरोपींनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक डि पाटील हे गुन्ह्या चा पुढील तपास करीत आहेत.