बार्शी – पतीच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांच्या जागी नोकरी मिळविण्यासाठी बार्शी नगरपरिषदेकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कथितरीत्या बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी निता प्रकाश शिंदे ऊर्फ निता सुग्रीव बोकेफोडे (रा. भीमनगर, बार्शी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बार्शी नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक रविंद्र भगवान गवळी यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, निता शिंदे यांनी त्यांचे पती प्रकाश दगडू शिंदे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने त्यांच्या जागी नोकरी मिळावी, यासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केला होता. अर्जासोबत आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, विवाह नोंदणीसंदर्भातील कागदपत्रे, रेशनकार्ड व जन्म प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात आल्या होत्या.
नगरपरिषदेच्या रेकॉर्डची पडताळणी करताना निता सुग्रीव बोकेफोडे या नावाने यापूर्वी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये जन्म तारीख १ जून १९७८ असल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुसरीकडे नोकरीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये जन्म तारीख १ जून १९९० असल्याचे आढळले.
या प्रकरणी नगरपरिषदेने संबंधित शाळा तसेच काटी, ता. तुळजापूर येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून मूळ अभिलेख मागवून १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान शाळेच्या मूळ नोंदींमध्ये जन्म तारीख १ जून १९७८ असल्याचे आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच १ जून १९९० रोजीचा ऑनलाइन जन्म दाखला रद्द करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून पत्र देण्यात आल्याचेही नमूद आहे.
या पडताळणीनंतर निता शिंदे यांनी नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला बनावट स्वरुपात तयार करुन ते खरे असल्याचे भासवून नगरपरिषदेकडे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 62, 336(2), 336(3) व 340(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार अजित वरपे करीत आहेत.
Post Views: 16