बार्शी – बार्शी-सोलापूर रोडवरील घोरवड्याच्या पुलाजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी राँग साईडने वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी संबंधित मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुनिल अर्जुन पवार (वय ५२, रा. पारधी कॅम्प, साठेलापूर रोड, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या युवराज विजय उर्फ विजू पवार व भाचा आकाश विजय पवार हे मुंबई येथे वास्तव्यास असून, समाजाच्या देवकार्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी बार्शी येथे आले होते. दि. २३ मे रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता युवराज व आकाश हे मित्र सचिन राजू पवार यांची एमएच १३ ईयू १७७२ क्रमांकाची मोटारसायकल घेऊन सौंदरे (ता. बार्शी) येथे निघाले होते.
सायंकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास सोलापूर रोडवरील रेल्वे ब्रिज ओलांडून घोरवड्याच्या पुलाजवळ आल्यानंतर समोरून एमएच १३ डीडब्ल्यू ११४८ क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल राँग साईडने भरधाव वेगात आली व दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या भीषण अपघातात युवराज पवार व आकाश पवार हे दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी युवराज विजय उर्फ विजू पवार यास मृत घोषित केले. तर आकाश पवार याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दुसऱ्या मोटारसायकलवरील विवेक विश्वनाथ सातपुते, सम्राट अरविंद पाटील व सुदर्शन सुहास दळवी (सर्व रा. सासुरे, ता. बार्शी) हे तिघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर सुविधा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
या अपघातात दोन्ही मोटारसायकलींचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.
Post Views: 9